यवल, जि. जळगाव - यावल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा महागड्या खुर्च्यांच्या खरेदीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवर जोरदार शाब्दिक चकमक झाली, मात्र दीर्घ चर्चेनंतर शहर विकासाशी संबंधित तब्बल १५० विषयांना अखेर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली, उपनगराध्यक्ष सईदाबी शेख आणि मुख्याधिकारी निशिकांत गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेच्या सुरुवातीपासूनच शहरातील मूलभूत सुविधा, विस्तारित वसाहतींमधील विकास आणि प्रशासकीय निर्णय यावर सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये मतभेद दिसून आले. नव्या बांधकामांना परवानगी देण्याचा विषय आणि विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणाऱ्या कामांऐवजी ती नगरपालिकेच्या माध्यमातूनच करण्यात यावीत, यासंदर्भातील ठराव मतदानाने मंजूर करण्यात आला. शहराच्या विकासासाठी स्थानिक स्तरावर निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी, अशी भूमिका अनेक सदस्यांनी मांडली.

सभेदरम्यान नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेसाठी खरेदी केलेल्या महागड्या खुर्च्यांचा मुद्दा अचानक ऐरणीवर आला. शिवसेना गटाचे गटनेते सागर चौधरी यांनी हा विषय उपस्थित करताच सभागृहात एकच खळबळ उडाली. खुर्च्यांच्या खरेदीची किंमत, प्रक्रिया आणि त्यातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

या वादावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष सौ. छाया पाटील यांनी सांगितले की, संबंधित खुर्च्यांच्या खरेदीचा ठराव मागील सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे खरेदी प्रक्रियेबाबत कोणालाही शंका असल्यास त्यांनी नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करावी. प्रशासन कोणत्याही चौकशीसाठी पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस, वादळी चर्चेनंतरही शहराच्या विकासाच्या १५० प्रकल्पांना मंजुरी देऊन सभा विफल होण्याऐवजी यशस्वी ठरली.