शीर्षक: अस्पष्ट फोटोच्या अडवळणातून रावेर पोलिसांची थरारक कारवाई; अमरावतीचा मुख्य मारेकरी मनप्रीतसिंह रंधावा जेरबंद

रावेर- रावेर पोलिसांनी केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे ट्रक चालकाचा गळा दाबून खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावलेल्या धक्कादायक गुन्ह्याचा मुख्य आरोपी मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा याला जेरबंद केले आहे.

अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मोर्शी हद्दीत उभ्या ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा जळालेला मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या संशयानुसार, गर्हित खून लपवण्यासाठी आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकला आग लावली.

तपासादरम्यान, आरोपी गुन्हा करून पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची आणि जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्टेशन परिसरात लपल्याची माहिती मिळाली. आज सकाळी ८:४८ वाजता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक (SP) ने जळगावच्या पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क साधून, आरोपी रावेर परिसरात असल्याची गुप्त माहिती दिली.

जळगाव एसपींच्या सूचनेवरून रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू केली. रावेर पोलिसांकडे कारवाई करताना केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध होता. कोणतीही ठोस ओळख नसतानाही पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि वेगाने शोध घेत संशयित आरोपी मनप्रीतसिंह रंधावा याला रावेरमधून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची आयशर गाडी (क्रमांक- PB-02-EW-4299) देखील हस्तगत करण्यात आली आहे. रावेर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे. आर्थिक (पैशांच्या) कारणातून त्याने मृत ट्रक चालकाचा आधी गळा दाबून खून केला आणि नंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहासह ट्रकला आग लावून दिली.

सध्या आरोपी रावेर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला अधिकृतरीत्या ताब्यात घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस येत आहेत.