रेल्वे प्रशासनाने अमरावती-सूरत एक्सप्रेसमध्ये आधुनिक एलएचबी कोचचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

गाडी क्रमांक 20926 अमरावती-सूरत एक्सप्रेस 29 मे 2026 पासून अमरावतीहून एलएचबी रेकसह धावेल. तर गाडी क्रमांक 20925 सूरत-अमरावती एक्सप्रेस 28 मे 2026 पासून सूरतहून नव्या कोचसह सेवेत येईल.

सध्या वापरात असलेला पारंपरिक आयसीएफ रेक काढून त्याजागी अत्याधुनिक एलएचबी रेक बसवला जाणार आहे. यामुळे गाडीची स्थिरता वाढेल, धावण्यात सुधारणा होईल आणि प्रवासादरम्यानचा आवाज कमी राहील.

एलएचबी कोचमध्ये प्रगत सस्पेन्शन, जास्त वेगाची क्षमता आणि सुधारित सुरक्षा व्यवस्था असते. अपघाताच्या वेळी डबे एकमेकांवर चढण्याचा धोका कमी असल्याने हे कोच अधिक सुरक्षित मानले जातात.

सुधारित रचनेनुसार या गाडीमध्ये एकूण 16 डबे असतील. त्यात 1 वातानुकूलित चेअर कार, 4 द्वितीय श्रेणी चेअर कार, 2 स्लीपर क्लास, 7 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 1 लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन यांचा समावेश आहे.

प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच थांबे आणि वेळापत्रकाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा NTES ॲप पाहण्याचेही सांगण्यात आले आहे.

या बदलामुळे विदर्भ आणि गुजरातदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक आधुनिक आणि सुरक्षित रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.