जळगाव । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून 'रेड' आणि 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान-मोठे धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामावरील संकट टळले असून बळीराजा सुखावला आहे. अनेक ठिकाणी पूर आला, तर काही भागात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली; मात्र या सर्व संकटात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठामपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. सर्वांची एकजूट आणि तत्परतेमुळे मदतकार्य अत्यंत वेगाने पार पडले.

आषाढीनंतर बदलले वातावरण
जळगाव जिल्ह्यात यंदा हवा तसा पाऊस झालेला नव्हता. राज्यातील आणि शेजारील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना आपला जळगाव जिल्हा मात्र कोरडाच होता. दुबार पेरणीचे संकट डोक्यावर होते, रब्बीचा हंगाम वाया जाण्याची भीती होती आणि गंभीर पाणीटंचाई समोर ठाकली होती. वारकरी मंडळींनीही विठूरायाच्या चरणी पावसासाठी साकडे घातले होते. अखेर एल-निनोच्या गर्तेतून अचानक वातावरण बदलले आणि आषाढी एकादशीपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली.

एकच दिवसात धो-धो बरसला
हवामान खात्याने अंदाज वर्तवत ३० जुलै रोजी महाराष्ट्रात केवळ जळगाव जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' तर ३१ जुलै रोजी 'यलो अलर्ट' जारी केला होता. रेड अलर्टचा इशारा मिळाल्यानंतर नागरिकांनी मुसळधार पावसाची मानसिक तयारी केली होती; मात्र दुपारी ४ वाजेपर्यंत पाऊस न आल्याने काहीशी निराशा पसरली. परंतु दुपारी ४ नंतर हवामानाने अचानक रूप बदलले आणि धो-धो पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. २००६ नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात तब्बल १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस कोसळल्याची नोंद झाली.

बळीराजा सुखावला, पण काही ठिकाणी नुकसान
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आधीच जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा दिला होता आणि आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधीही जळगावातच उपस्थित होते. रात्र ओसरून पहाट होताच पावसाच्या पाण्याचे रौद्ररूप समोर आले. जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नदी-नाल्यांना पूर आला, सखल भागांत पाणी साचले, काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले तर अनेक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

जिल्हाधिकारी २४ तास 'ऑन फिल्ड'
जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिवसभरात संपूर्ण जिल्हा पालथा घालत प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपले काम चोख बजावले, ज्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले. १ महिन्याच्या बाळापासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठी विशेष बचाव मोहीम राबवून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र, दुसरीकडे पावसाच्या या तांडवात एक तरुण वाहून गेला, दोघे बेपत्ता झाले आणि भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. शेकडो नागरिकांचे संसार पाण्याखाली गेले, ही अत्यंत दुर्दैवी बाब ठरली.

जळगाव मनपा प्रशासनाची तत्परता
जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केट, नवीन बी. जे. मार्केट आणि गोलाणी मार्केटच्या तळघरात पाणी साचल्याने दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळीच आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जिवने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करून पाण्याचा उपसा सुरू केला. ड्रेनेज व गटारींमधील अडथळे दूर करण्यात आले. मनपा प्रशासनाने आहेत त्या सर्व साहित्यांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले, किंबहुना काही साहित्य बाहेरून मागवले आणि काम पूर्ण केले. जिथे गरज पडली तिथे चेंबर तोडून किंवा पाइप कापून नागरिकांना तत्काळ दिलासा दिला गेला. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी ठोस नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त आदित्य जिवने यांनी दिले.

पुराच्या पाण्यात अन् आगीच्या धुरात... 
सर्वत्र आमदार राजूमामा भोळे
मुसळधार पावसात नागरिकांच्या भेटी घेणे, यंत्रणेला सूचना देणे, फोनवरून परिस्थितीचा आढावा घेणे आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात आमदार राजूमामा भोळे आघाडीवर दिसले. काही ठिकाणी नागरिकांचा रोष लक्षात घेऊन त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. ते स्वतः पुराच्या पाण्यात उतरले. एका परिसरात पाण्याचा निचरा व्हावा म्हणून त्यांनी भिंत फोडण्याच्या सूचना दिल्या. आगीच्या घटनेतही नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी पोलिसांना आवश्यक निर्देश दिले.

महापौर रस्त्यावर; काही नगरसेवक मात्र 'मिसींग'
जळगावच्या महापौर दीपमाला काळे स्वतः सकाळीच रस्त्यावर उतरल्या. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी मदतकार्य वेगाने सुरू केले. सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. या कठीण काळात काही प्रभागांतील नगरसेवक मात्र 'मिसींग' असल्याचे चित्र दिसले. काही नगरसेवकांनी प्रत्यक्ष फिरून कामे करून घेतली, तर काहींनी घरूनच फोनवरून पाठपुरावा केला. प्रचंड दबावाखाली असतानाही मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धैर्याने काम पार पाडले. नगरसेवकांचा संताप देखील सहन केला.

लोकप्रतिनिधींची धावपळ आणि मदतीची आस
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर सर्वच लोकप्रतिनिधी लक्ष ठेवून होते. आमदार किशोर पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसले; तर मंत्री महोदय मुंबईत असल्याचे समजले. आता पाऊस ओसरला असून नुकसानीचे खरे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी सरकार आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलीस प्रशासन ऑलवेज अलर्ट
पावसाच्या काळात पोलीस दल अत्यंत सतर्क होते. पूर असो वा आगीची दुर्घटना, गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि बचावकार्यात मदत करणे यासाठी पोलीस दल सज्ज होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. बायपास महामार्गाचा भराव खचल्यानंतर त्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत वाहतूक शहरातून सुरळीत वळवली.