जळगावमध्ये शेतकऱ्यांसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चार तास घेराव आंदोलन केले. दुपारी 4 वाजता सुरू झालेले आंदोलन रात्री साडेसातपर्यंत चालले. या काळात कार्यालयातील कोणतेही शासकीय वाहन बाहेर जाऊ देण्यात आले नाही.

जिल्ह्यात डिझेलची टंचाई तीव्र झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आणि शेतमाल वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांना इंधन मिळत नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. आगामी मशागत आणि पेरणीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान प्रशासनाशी चर्चा झाली. शासनाने उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील तहसील कार्यालये आणि इतर शासकीय कार्यालयांबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

तसेच जिल्ह्यात कोणत्याही शासकीय अधिकारी, आमदार किंवा खासदारांची वाहने फिरू दिली जाणार नाहीत, असेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काही काळ दणाणून गेला.

शेतकऱ्यांच्या डिझेल प्रश्नावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.