यावल तालुक्यातील दिव्यांग नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि दिव्यांगांसाठीचे निर्णय प्रभावीपणे राबवावेत, या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने यावल तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या वेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, तसेच महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या उपक्रमामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. हा उपक्रम प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील आणि उपाध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
निवेदनात दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजना, सवलती आणि निर्णयांची माहिती पोहोचावी यासाठी स्वतंत्र जनजागृती अभियान राबविण्याची मागणीही करण्यात आली.
तसेच शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांना सुलभ सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली. निवृत्ती वेतन, दिव्यांग प्रमाणपत्रे, वैद्यकीय सुविधा आणि योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी महिला दिव्यांगांनी यावेळी मांडल्या.
प्रशासनाने दिव्यांगांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दिव्यांग कल्याणाशी संबंधित निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

