यावलमध्ये वाढलेल्या डिझेल आणि पेट्रोल टंचाईच्या विरोधात शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. इंधनाअभावी नागरिक, शेतकरी, वाहनचालक आणि व्यापारी मोठ्या अडचणीत सापडल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या मोर्चामुळे यावल शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. शहरातील विविध भागांतून घोषणाबाजी करत कार्यकर्ते तहसील कार्यालयावर जमा झाले. नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. तालुका प्रमुख शरद कोळी, उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोर्चाच्या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना रांगेत तासन्तास थांबावे लागू नये, अशी मागणी करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक अतुल पाटील यांनी प्रशासनावर टीका करत सामान्य नागरिकांचा संयम संपत चालल्याचे सांगितले. टंचाईमुळे शेतीची कामे, वाहतूक व्यवस्था आणि रोजचे व्यवहार विस्कळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेना (उबाठा) चे यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. मोर्चादरम्यान सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी पुन्हा एकदा करण्यात आली.