जळगावमध्ये महिला व बाल विकास विभागाशी संबंधित गंभीर आरोपांमुळे प्रशासनात चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीमहोदयांच्या स्वीय सहाय्यक राजेश गायकवाड यांच्यावर जातीय अपमान, धमकी आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात जळगाव दक्षिण येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. तडवी यांनी लेखी तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तडवी यांनी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेकडे दिलेल्या निवेदनात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्याची विनंतीही केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2021 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेत जळगावचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे पद रिक्त असतानाही त्यांना त्या पदावर संधी देण्यात आली नाही. त्याऐवजी बदली करून बीड येथे पाठविण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे.
आपण तडवी भिल्ल या आदिवासी समाजातील असल्यानेच आपल्यावर अन्यायकारक वागणूक झाली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याशिवाय 2024 मधील सर्वसाधारण बदल्यांमध्येही जळगाव जिल्हा परिषदेतील जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) हे पद रिक्त असूनही स्वतःला डावलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या अर्जाकडे दुर्लक्ष करून आपल्यापेक्षा दहा वर्षांनी कनिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असेही तक्रारीत म्हटले आहे.
तडवी यांच्या तक्रारीनुसार, बदलीसाठी मंत्रालयात वारंवार भेट दिल्यानंतर राजेश गायकवाड यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप आहे. तसेच ‘गुपचूप नोकरी कर, नाहीतर तात्काळ निलंबित करीन’ अशा शब्दांत दबाव टाकण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.
जातीय स्वरूपाचे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता अधिकारी संघटनांकडून पुढे येत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशीही मागणी केली जात आहे.

