वरणगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात शुक्रवारी महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात चक्काजाम आंदोलन केले. महागाई, पेट्रोल-डिझेलची टंचाई, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

तिरंगा सर्कल परिसरात झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते.

केंद्र सरकार इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेला त्रास देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. महागाईमुळे घरगुती खर्च वाढला असून मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर ताण वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. बेरोजगारीवर ठोस उपाय न केल्याबद्दलही सरकारवर टीका करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आल्याचेही आंदोलकांनी नमूद केले. उत्पादन खर्च वाढत असताना कृषीमालाचे दर घसरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या चक्काजाममुळे तिरंगा सर्कल परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने नागरिकांची गैरसोय झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता.

या वेळी प्रतिभा तावडे, मनोज देशमुख आणि जवरे सर यांनी माध्यमांशी बोलताना महागाई आणि बेरोजगारीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. सरकारने जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.