पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या सरींमुळे काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली, तर गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.

शहरात दुपारनंतर ढग दाटून आले आणि पश्चिम तसेच पूर्व भागांत पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत वादळी वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पाणी साचल्याचेही दिसले. गेल्या काही दिवसांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

मध्य पुण्यासह उपनगरांतही जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने पुढील दोन दिवस शहरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भोर तालुक्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कोंढवा परिसरातील ज्योती चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. काही ठिकाणी पावसापासून बचावासाठी नागरिकांना आडोशाला थांबावे लागले. पिंपरी-चिंचवडमध्येही दुपारी अचानक अंधारून आले. काळे ढग दाटल्याने दुपारीच संध्याकाळ झाल्यासारखे वाटत होते. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता. मात्र शुक्रवारी हवामानात अचानक बदल झाला. जोरदार सरींमुळे काही नागरिक आणि वाहनचालक पावसात अडकले. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील काही भागांतही पाऊस झाल्याची माहिती आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कायम आहे.