नशिराबाद येथे जळगाव तालुक्याचे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सभापती पंकज शामकांत महाजन यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.
महाजन यांनी म्हटले आहे की, नशिराबाद हे ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शहर असून ब्रिटिश काळात ते परगणा म्हणून ओळखले जात होते. त्या काळात येथे तहसील कार्यालय, न्यायालय आणि फाशीची व्यवस्थाही होती. व्यापार आणि महसुली कामकाजाचे हे प्रमुख केंद्र होते. मात्र स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्हा आणि तालुक्याचा विस्तार वाढत गेला आणि प्रशासकीय केंद्र जळगावकडे स्थलांतरित झाले.
सध्याच्या घडीला जळगाव तालुक्याचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जळगावमधील महसूल कार्यालयांवर प्रचंड ताण येत असून नागरिकांच्या कामांमध्ये विलंब होत आहे. महसूल प्रशासन अधिक वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने २ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर आणि जळगाव तालुक्यांसाठी अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी दिली आहे.
नशिराबाद येथे हे कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील अनेक गावांना थेट फायदा होईल, असा दावा महाजन यांनी केला आहे. नशिराबाद नगरपरिषद स्थापन झाल्यापासून शहराचा विकास वेगाने सुरू आहे. त्यामुळे जळगाव तालुक्याचे अप्पर तहसील कार्यालय येथेच उभारल्यास नागरिकांची गैरसोय कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
उमाळा, देव्हारी, चिंचोली, धानवड, धानवड तांडा, कुसुंबे खुर्द, कढोली, रायपूर, मण्यारखेडा, बेळी, निमगाव, भागपूर, जळगाव खुर्द, तिघ्रे, खिर्डी, कडगाव, कानसवाडे, शेळगाव, देऊळवाडे, भोलाणे, सुजदे, भाद अशा ५० हून अधिक गावांना या निर्णयाचा थेट फायदा होईल, असा त्यांचा दावा आहे.


