जळगाव शहरातील वाढत्या दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत वाहनचोरांना अटक केली आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत १ लाख ८७ हजार रुपये आहे.
१७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता संतोष रणछोड सैंदाणे यांच्या मालकीची होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक MH 19 CL 7558) ही सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून चोरीला गेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने विशेष पथकाची स्थापना करून तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ, शहरातील विविध भाग आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी सुरू केली.
तांत्रिक विश्लेषणासाठी ‘नेत्रम’ कार्यालयातील पोलीस कर्मचारी मुबारक देशमुख यांची मदत घेण्यात आली. तपासादरम्यान महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून चार वाहने हस्तगत केली. त्यात ५० हजारांची होंडा शाईन, ५२ हजारांची टीव्हीएस वेगो मोपेड, ५० हजारांची हिरो डिलक्स आणि ३५ हजारांची बजाज पल्सर यांचा समावेश आहे. सर्व वाहनांसह पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

