जळगाव जिल्ह्यात येत्या २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पाच वर्षांखालील ४ लाख ७ हजार ९७८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने मोहिमेसाठी व्यापक तयारी केली आहे. यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला असून जिल्ह्यात ३ हजार १५० पोलिओ बूथ उभारले जाणार आहेत. तसेच २ हजार ९२६ आयपीपीआय टीम, ६४९ मोबाईल टीम आणि १३१ ट्रान्झिट टीम तैनात राहणार आहेत.

मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, डीन डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोहिमेच्या दिवशी सर्व बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब दिले जाणार आहेत. त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस आरोग्य पथके घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना डोस देतील. कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.

बैठकीत भारताच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. १९९५ पासून सलग राबवलेल्या पल्स पोलिओ मोहिमेमुळे १३ जानेवारी २०११ नंतर देशात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. त्यानंतर मार्च २०१४ मध्ये भारताला अधिकृत पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला होता.

जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पालकांना ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.