जळगाव शहरात जुन्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ला आणि घर जाळण्याच्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशाल अजय सुरवाडे (वय ३०, रा. जळगाव) याला २० मे रोजी जळगावातूनच ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरत रेल्वे गेट परिसरात जुन्या वादातून मोठा राडा झाला होता. राजमालती नगरमधील १२ ते १३ जणांच्या टोळक्याने रेहान ऊर्फ जानू संजू पटेल याला मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याच झटापटीत आरोपी विशाल सुरवाडेचा नातेवाईक सिद्धार्थ वानखेडे याचा मृत्यू झाला होता. त्यातून संतापून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी राजू पटेल यांच्या राजमालती नगरमधील घरावर हल्ला केला. घराची तोडफोड करत साहित्याला आग लावण्यात आली. संपूर्ण घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आणखी एक गुन्हा दाखल झाला होता.

या दोन्ही प्रकरणांतील इतर आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती. मात्र विशाल सुरवाडे दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता.

दरम्यान, २० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तो जळगाव शहरात आल्याची गोपनीय आणि तांत्रिक माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने राजमालती नगर परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.