जळगावमध्ये दिव्यांग बांधवांना रोजगार, स्वयंरोजगार आणि करिअरच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी विशेष व्यावसायिक पुनर्वसन व करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव संचलित ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ आणि भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत ‘नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग पुरुष आणि महिलांनी या शिबिराला मोठ्या संख्येने हजेरी लावली.
उपस्थितांना रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या योजना आणि शासकीय सवलती यांची सविस्तर माहिती देण्यात आली. दिव्यांगांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन, चेअरमन मंगला ठोंबरे, किशोर साखळे, योगेंद्र कुशवाह, जी. टी. महाजन, मुकुंद गोसावी आणि ‘उडान’ संस्थेच्या हर्षाली चौधरी यांची उपस्थिती होती. त्यांनी दिव्यांग युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचे करिअर घडविण्याचे आवाहन केले.
शिबिरात विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि पुनर्वसन प्रक्रियेची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांच्या शंकांना तज्ज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या पथकाने विशेष मेहनत घेतली. एस. पी. गणेशकर, अक्षय महाजन आणि गणेश पाटील यांनी नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन सुवर्णा चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार माने यांनी केले.

