जळगाव : आधार कार्ड हरवले, खराब झाले किंवा सोबत ठेवणे टाळत असाल, तरी काळजी करण्याची गरज नाही. UIDAI च्या अधिकृत सुविधांमधून नागरिकांना ई-आधार आणि पीव्हीसी आधार कार्ड सहज मिळू शकते. ई-आधार ही आधारची डिजिटल PDF प्रत असून ती मूळ कार्डइतकीच वैध मानली जाते.
ई-आधार डाउनलोड करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागते. ‘My Aadhaar’ विभागात ‘Download Aadhaar’ हा पर्याय निवडल्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा भरायचा असतो. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येतो. तो टाकून पडताळणी केल्यावर आधारची PDF फाइल डाउनलोड होते.
ही PDF उघडण्यासाठी पासवर्डची गरज असते. तो पासवर्ड नावातील पहिली चार अक्षरे कॅपिटलमध्ये आणि जन्मवर्ष यांचा मिळून तयार होतो. त्यामुळे आधारची डिजिटल प्रत सुरक्षित पद्धतीने वापरता येते.
आधार कार्ड हरवले असेल किंवा जुने कार्ड खराब झाले असेल, तर UIDAI कडून पीव्हीसी आधार कार्डही मागवता येते. हे प्लास्टिक स्वरूपातील मजबूत कार्ड असून त्यात QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट आणि प्रिंट तारीख अशी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात.
पीव्हीसी कार्डसाठी UIDAI च्या वेबसाइटवर ‘Order Aadhaar PVC Card’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP पडताळणी पूर्ण करावी लागते. माहिती तपासून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI यापैकी एका माध्यमातून 75 रुपयांचे शुल्क भरल्यावर ऑर्डर नोंदवली जाते.
UIDAI कडून हे कार्ड साधारणपणे पाच ते सात दिवसांत छापून भारतीय टपाल विभागाकडे दिले जाते. त्यानंतर स्पीड पोस्टद्वारे ते थेट घरी पोहोचते. ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रातूनही मदत घेता येते.

