जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आधार कार्ड हे सध्या अत्यावश्यक ओळखपत्र बनले आहे. बँक खाते, सरकारी योजना, मोबाईल सिम, शिक्षण प्रवेश आणि अनेक दैनंदिन कामांसाठी त्याची गरज भासते. त्यामुळे कार्ड हरवणे किंवा खराब होणे ही मोठी अडचण ठरू शकते. अशा वेळी ई-आधार आणि PVC आधार कार्ड उपयुक्त ठरतात.
UIDAI च्या माहितीनुसार ई-आधार ही आधारची डिजिटल प्रत असून ती मूळ कार्डइतकीच वैध आहे. ही PDF स्वरूपातील फाइल UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून काही सोप्या टप्प्यांत डाउनलोड करता येते. त्यासाठी ‘My Aadhaar’ विभागात जाऊन ‘Download Aadhaar’ हा पर्याय निवडावा लागतो. पुढे १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून ‘Send OTP’ वर क्लिक करावे लागते. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर ई-आधार PDF स्वरूपात डाउनलोड होते. ही फाइल उघडण्यासाठी नावातील पहिली चार अक्षरे आणि जन्मवर्ष हा पासवर्ड वापरावा लागतो.
आधार कार्ड हरवले किंवा जुने होऊन खराब झाले तरी नवीन कार्ड मिळवण्याची सोय उपलब्ध आहे. UIDAI कडून PVC आधार कार्डची सेवा दिली जाते. हे प्लास्टिक कार्ड अधिक टिकाऊ असते आणि त्यावर सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, प्रिंट डेट यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात.
PVC आधार कार्डसाठी नागरिकांनी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP पडताळणी पूर्ण करावी लागते. कार्डवरील माहिती तपासून पेमेंट केल्यानंतर ऑर्डर नोंदवली जाते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ७५ रुपयांचे शुल्क भरावे लागते.
UIDAI कडून कार्डची छपाई करून ते साधारण पाच ते सात दिवसांत टपाल विभागाकडे दिले जाते. त्यानंतर स्पीड पोस्टने PVC आधार कार्ड थेट घरपोच मिळते. ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया शक्य नाही, त्यांच्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊनही मदत घेता येते.

