बोदवड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यासह तीन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये टाऊन बीटचे प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल आणि पोलिस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणात कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे आणि वेळेत योग्य उपाययोजना न केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी बोदवड पोलिस ठाण्यात एका प्रकरणाची नोंद झाली होती. त्यानंतर फिर्यादी पक्षांमध्ये वाद वाढत गेला आणि त्यातून आणखी एक अदाखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण असतानाही कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे प्रतिबंधक कारवाईची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी चौकशी किंवा आवश्यक प्रतिबंधक पावले उचलली नाहीत.
वाद अधिक चिघळत असताना १९ मे रोजी हिदायत नगर भागात पुन्हा संघर्ष सुरू असल्याचा फोन आला. त्यावर एएसआय रवींद्र गुरचल हे आणखी एका कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गटांतील जुना तणाव लक्षात घेता त्यांना तातडीने कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी केवळ समज देऊन प्रकरण तिथेच सोडले.
या निष्काळजीपणाचा परिणाम पुढे गंभीर स्वरूपात दिसून आला. २१ मे रोजी दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापट होऊन एका व्यक्तीचा खून झाला. यामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ निर्माण झाली.
या संपूर्ण प्रकाराची माहिती नगरसेवकांसह काही पोलिस कर्मचाऱ्यांनी फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे प्रभारी अधिकारी दीपक सुरवडकर यांना दिल्याचेही समोर आले आहे. तरीही त्यांनी स्वतः कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तसेच अधिनस्तांना आदेश दिले नाहीत. वरिष्ठांनाही आणि नियंत्रण कक्षालाही योग्य ती माहिती देण्यात आली नाही.
पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ कार्यालयाने तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.

