मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येत्या काही दिवसांत सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांच्या प्रस्तावित संपामुळे आणि आधीच लागलेल्या सुट्ट्यांमुळे शाखांमधील प्रत्यक्ष कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आवश्यक बँकिंग व्यवहार वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर 24 मे रोजी रविवारची सुट्टी असेल. यानंतर 25 आणि 26 मे रोजी एसबीआय कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिली आहे. त्यामुळे दोन दिवस शाखा सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे.
या सलग सुट्ट्यांनंतर 27 आणि 28 मे रोजी बकरीदनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी सलग सहा दिवस शाखांचे कामकाज प्रभावित होऊ शकते. रोख व्यवहार, पासबुक अपडेट, चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट आणि इतर शाखा-आधारित सेवा रखडण्याची शक्यता आहे.
बँकिंग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा संप काही प्रलंबित मागण्यांशी संबंधित आहे. यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीशी निगडित मुद्दे, आउटसोर्सिंग, सेवा अटी आणि पदोन्नतीच्या संधी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, डिजिटल सेवा सुरू राहणार आहेत. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय व्यवहार, एटीएम सेवा आणि इतर ऑनलाइन पेमेंट सिस्टीमवर परिणाम होणार नाही. मात्र, शाखेत जाऊन करावी लागणारी कामे पुढे ढकलण्याची वेळ ग्राहकांवर येऊ शकते. त्यामुळे आवश्यक आर्थिक व्यवहार 23 मेपूर्वी पूर्ण करणे अधिक सुरक्षित ठरेल.

