सावदा शहरात पुढील दोन ते तीन दिवस पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. हतनूर धरणातून आसपासच्या गावांसाठी पाणी सोडण्यात आल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत आहे.

उपसा विहिरीजवळील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या परिस्थितीची दखल घेत नगरपालिकेने तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता कामे सुरू केली आहेत.

नगराध्यक्षा रेणुका पाटील, उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती फिरोजखान पठाण, नगरसेवक सचिन बऱ्हाटे, नकुल बेंडाळे, जे. के. भारंबे, मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन यांनी मंगळवाडी येथील जॅकवेल परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीत जॅकवेलजवळील पाइपलाइनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे आढळले. या गाळामुळे यंत्रणेवर ताण आला असून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर गाळ काढणे आणि पाइपलाइन साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

नगरपालिकेने सांगितले की, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती सुरू आहे. मात्र शहरातील पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागू शकतात. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.