अमळनेर शहरात मोकाट डुकरांच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. ऐंशी फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी गेलेल्या योगिता सहदेव पाटील या महिलेला मंगळवारी रात्री डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले.

मुंदडा नगर ते आर. के. नगर परिसरातील हा रस्ता सायंकाळी आणि रात्री फिरण्यासाठी नागरिकांची पसंतीचा ठरतो. मात्र, मोकाट जनावरे आणि विशेषतः डुकरे यांचा वावर वाढल्याने या भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

माहितीनुसार, महावीर नगर परिसरातील योगिता पाटील या आपल्या मुलीसोबत फिरत असताना मागून आलेल्या डुकराने त्यांच्या गुडघ्याच्या मागील बाजूस चावा घेतला. हल्ला इतका अचानक झाला की काही क्षण परिसरात गोंधळ उडाला.

प्रसंगावधान राखत त्यांच्या मुलीने डुकराला हटवण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरड करून नागरिकांना मदतीस बोलावले. त्यानंतर जखमी महिलेला तत्काळ डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरात मोकाट डुकरे, कुत्रे आणि इतर जनावरे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.

विशेष म्हणजे, ऐंशी फुटी रस्त्यावर अवघ्या आठवडाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप वाढला असून नगरपालिकेने तातडीने कारवाई करून मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, अमळनेर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे यांनी सांगितले की, शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांबाबत संबंधित विभागाकडून पाहणी केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.