अमळनेर तालुक्यातील तापी नदीकाठावर धावडे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या महिनाभरापासून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नदीपात्र अधिक खोल होत असून भविष्यात पाणीटंचाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर सावखेडा, धावडे, मुंगसे, रुंधाटी आणि गंगापुरी या भागातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. धावडे येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सावखेडा वाळू घाटाचे कंत्राटदार बोटींच्या मदतीने धावडे परिसरातून अवैध उपसा करत आहेत. निविदेत बोटींचा वापर करण्यास परवानगी नसतानाही हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपसा केलेली वाळू डंपरमधून नेली जात असल्याने परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

सावखेडा ते अमळनेर हा मार्ग सततच्या जड वाहतुकीमुळे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे शाळकरी मुले, वाहनचालक आणि ग्रामस्थांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.

वाळू चोरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना आणि दक्षता समितीच्या सदस्यांना धमकावले जात असल्याचाही आरोप आहे. काही ठिकाणी अंगावर डंपर घालण्याच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात वाळू उपशामुळे नदीतील पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे धावडे आणि आसपासच्या गावांवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते. धावडे येथून इतर गावांना पाणीपुरवठा होत असल्याने या प्रकाराचा थेट परिणाम अनेक गावांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.